जिल्हा परिषदेच्या दक्षता समितीच्या अहवालावरच आक्षेप .
नाशिक : जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात तयार झालेला रस्ता चक्क चोरीला गेला असल्याची तक्रार गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे झाली होती. त्यानंतर नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात रस्ता जागेवरच असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, त्यानंतरही तक्रारदार विठोबा द्यानद्यान स्वतःच्या म्हणण्यावर ठाम राहिले. आता तर तक्रारदार द्यानद्यान यांनी थेट जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या न्यायालयातच दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे याचा 'जाऊ तिथे खाऊ' हा चित्रपट रिलीज होऊन १५ वर्षे झाली. पण, हा चित्रपट लोक आजही आवडीने बघतात. चित्रपटात
विनोदी पद्धतीने विहिरीची झालेली चोरी व त्यातून
होणारा भ्रष्टाचार या गंभीर विषयावर भाष्य केले आहे. चित्रपटातील ही कथा मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात रस्ता चोरीबाबत घडली आहे. मागच्या वर्षी टोकडे येथे मार्च महिन्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तयार झालेला १८ लाख रुपये किमतीचा रस्ता वर्षभरातच चोरीला गेल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात चोरीची रितसर तक्रार दाखल केली होती. प्रशासनाकडून या अजब चोरी प्रकरणाचा वेळोवेळी शोध घेण्याचा प्रयत्न झाला. रस्ता शोधून देणाऱ्यास यापूर्वी एक लाख रुपये, नंतर दोन लाख रुपये व आता पाच लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून आठ महिन्यांपासून अनेक पथकांकडून या रस्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या रस्त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनही हतबल झाले होते. अखेर कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांच्या पथकाने गावठाणापासून दूरवर एक शिवरस्ता दाखवत त्यांनी तक्रारदारास हाच रस्ता
पंधराव्या वित्त आयोगातून केला असल्याचे सांगितले. तसा अहवाल देखील जि.प. सीईओ यांना दिला होता. मात्र, तक्रारदार द्यानद्यान यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आता थेट जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे याचिका दाखल केली असून त्यात रस्ता दुरुस्तीकामी मिळालेल्या निधीचा अपहार झाला असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणा झेडपी सीईओ, उपकार्यकारी अभियंता पंचायत समिती मालेगाव,
कार्यकारी अभियंता (इवद) झेडपी, गटविकास अधिकारी मालेगाव, सरपंच व ग्रामसेवक टोकडे गाव यांना प्रतिवादी केले आहे.