पारनेर| तालुका प्रतिनिधी
जळगाव येथून प्रवाशांना घेऊन पुण्याकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात आग लागल्याची घटना शनिवार पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ३० प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.याबाबत सुपा पोलिसांनी सांगितले कि, बस चालक विलास गुलाब जुमडे (रा. खामगाव हे) लक्झरी (क्रमांक MH 29 AW 5455) जळगाव ते पुणे इथून तीस प्रवासी घेऊन पुण्याकरता निघाली होती. नारायणगाव येथे आल्यावर अचानक गाडीमध्ये शॉर्टसर्किट होऊन बसला आग लागली. बस चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना गाडीच्या बाहेर काढले. त्यामुळे मोठी जिवीत हानी टळली.घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी येथील फायर ब्रिग्रेड, पारनेर येथील 108 व सुपा पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांनी तात्काळ हजर होऊन, प्रवाशाना आवश्यक ती मदत केली. जळालेले वाहन क्रेनच्या मदतीने बाजूला केले असुन वाहतूक सुरळीतपणे चालू केली असल्याची माहीती पोलिसांनी दिली