मालेगाव । वार्ताहर
मालेगाव:
राज्य शासनाने विक्रीसाठी बंदी घातलेल्या सुगंधित पानमसाला व गुटखा तंबाखू यांची शहरात अद्यापही खुलेआम विक्री सुरू आहे. पोलिस कारवाईचा धाक
दाखवून गुटखा विक्रेते शहरात चढ्या दराने गुटख्याची विक्री करीत आहेत. पोलिस कारवाई नंतरही गुटख्याची ही बेकायदेशीर विक्री बंद होत नाही हे पोलीस यंत्रणेचे अपयश असल्याची चर्चा आता होत आहे.
गेल्या काही दिवसापासून शहरात पोलीस कारवाई करीत असूनही सुगंधित पानमसाला व गुटखा तंबाखू यांची विक्री दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर
हे गुटखा विक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. ग्रामीण भागातील पान टपरी व किराणा दुकानावर गुटखा विक्री खुलेआम होत आहे.दरम्यान शहरात
आयेशानगर व पवारवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे पाऊण लाख रूपयांचा विविध प्रकारचा गुटखा व सुगंधित पानमसाला याचा साठा जप्त केला आहे. शहरातील बिस्मिल्लानगर भागात गुटखा साठा बाळगणाऱ्या हनिफ अमिर शेख याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील २१ हजार
रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पो. शि. राहुल पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हनिफ शेख विरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पवारवाडी पोलिसांनी जाफरनगर भागात केलेल्या कारवाईत इम्रान अहमद निहाल अहमद रा. जाफरनगर पाट किनारा याच्या ताब्यातील ऐशी हजार रूपयांचा
गुटखा जप्त केला. पो. शि. नवनाथ जिभाऊ शेलार यांनी
दिलेल्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलिसांनी इम्रान यास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोउनि सुपनर हे तपास करीत आहेत.