सटाणा: प्रतिनिधि
वाढत्या ॲट्रोसिटीच्या घटनांना आवर घालण्याऐवजी महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन, महसूल, ग्राम प्रशासन पीडितांना कायद्याने आधार देण्याऐवजी उलट ॲट्रोसिटीच्या फिर्यादींवरच दडपण आणतात, पीडितांवरच क्रॉस कंप्लेंट दाखल करतात त्यामुळे ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यांमधिल आरोपींना कायद्याचा धाक न बसता त्यांची मुजोरी वाढते आणि त्याची परिणीती म्हणून अक्षय भालेराव हत्याकांडासारख्या घटना घडतात असे परखड मत यावेळी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केले.
बौद्ध, दलित, आदिवासींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर आवर घालण्यात शासन अपयशी ठरत असून याऊलट गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची परिस्थिती आहे. या कारणास्तव सटाणा येथे सर्व संविधानवादी नागरीकांच्या वतीने जनआक्रोश मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून
या मशालमोर्चाला सुरुवात होऊन पेठ गल्ली ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर तहसिल कचेरी येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला.
अक्षय भालेराव च्या खून्यांना फाशीची शिक्षा व्हावी, त्याच्या कुटूंबाचे तातडीने पुनर्वसन व्हावे, कुटूंबाला सरंक्षण मिळावे, प्रत्येक ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पोलीस प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर रहावे यांसह विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार आणि पोलीस निरिक्षक यांद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना सादर करण्यात आले.
या जनआक्रोश मशाल मोर्चात केंद्र आणि राज्य सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला याप्रसंगी बागलाण, कळवण, देवळा या तालुक्यांमधून हजारोंच्या संख्येने बौद्ध, दलित आणि आदिवासी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.