मुंबई । Mumbai
मुख्य संपादक : समाधान जगताप
धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ४ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका रेल्वे पोलीस जवानानेच हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये चेतन सिंह नावाच्या आरपीएफ कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. या जवानाने आरपीएफच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाबरोबरच 3 प्रवाशांवर गोळीबार केला. एका सीआरपीएफ जवानानेच हा गोळीबार केला आहे. आरोपीला अटक करुन भाईंदर पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं?
जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा पहाटे साडेपाचच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर बोरिवली स्थानकापूर्वी गाडीचा वेग मंदावल्यानंतर जवान चेतन कुमार याने पळ काढला. यानंतर जयपूर-मुंबई एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. ४ जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपी चेतन कुमारला भाईंदर येथे अटक करण्यात आली.
जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमधील एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी घडलेल्या घटनेबाबत एका वृत्तवहिनीला माहिती दिली आहे. “सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास डब्यात गोळीबाराचा आवाज आला. तेव्हा पाहिलं की, जवानाच्या हातात बंदूक होती. त्याने एएसआय यांना गोळी मारलेली. एएसआय खाली पडले होते. जवान हातात बंदूक घेऊन डब्यात फिरत होता. जवानाने अन्य प्रवाशांवरही गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे डब्यातील सर्व प्रवाशी घाबरले होते,” असा थरारक प्रसंग कृष्णकुमार शुक्ला यांनी सांगितलं आहे.
कोण आहे आरोपी?
आरोपी चेतन कुमार हा आरपीएफचा जवान आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसह विविध राज्यांमध्ये सेवा देत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची सुरक्षेसाठी रेल्वे विभागात नियुक्ती करण्यात आली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी चेतनची चौकशी केली जात असून त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. चेतन कुमारने केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या चौघांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात येत असून रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहचल्याची माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे. आरोपीचा हेतू काय होता आणि त्याने गोळीबार का केला, हे समजू शकले नाही.