प्रतिनिधी- दादासाहेब पवार
सटाणा- आज तालुक्यातील मुळाणे गावी विहिरीतून क्रेनच्या सहाय्याने गाळ काढत असताना अचानक क्रेनचा रोपवे तुटल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने तालुक्यात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुळाणे गावातील शेतकरी यशवंत सखाराम रौंदळ यांच्या शेतातील विहिरीचा गाळ काढण्याचे काम गावातीलच क्रेन मालक विनायक नाडेकर यांना देण्यात आलेले होते.आज नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण झाल्यानंतर गाळ काढणारे कामगार गणेश तुळशीराम नाडेकर वय २६, नितीन रामदास अहिरे वय २७, गणेश विनायक नाडेकर वय २६ हे क्रेनव्दारे विहिरीत उतरत असताना अचानक वायररोप तुटल्याने तिन्ही युवक विहिरीत कोसळले.सुमारे पन्नास ते पंचावन्न फुट खोल असलेल्या विहिरीत कोसळल्याने या तिघांही युवकांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.तिन्ही युवकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेत.दरम्यान तिन्ही युवकांचे विवाह झालेले असून या घटनेमुळे त्यांचे नवखे संसार उघड्यावर पडल्याने मुळाणे गावांसह संपूर्ण सटाणा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे