नाशिक : कॉलेजच्या आवारात असलेल्या कॅफे चालकास कारवाई करण्याबाबत धमकावत त्याच्याकडून अडीच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षकास न्यायालयाने एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) असे संशयित लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोसावी यांनी नियमभंग करुन कॉलेज रोड परिसरातील कॅफे चालकास धमकावत दरमहा हप्ता बांधून घेतला होता.कॅफे चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने त्याच्या कॅफेत येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘प्रायव्हसी’ असावी म्हणून आडोसा केला होता. ही बाब हेरुन गोसावी यांनी सहा महिन्यांपूर्वी कॅफेचालकाकडे ‘तू कुंटणखाना चालवितोस, तुझ्यावर कारवाई करेन’ असा दम देत कॅफेवर कारवाई न करण्यासाठी दरमहा तीन हजार रुपयांचा हप्ता बांधून घेत वसूल केला.कॅफेत कुठलाही गैरप्रकार चालवत नसल्याचे लाच का द्यावी, असे कॅफे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने बुधवारी (ता. ६) सापळा रचून हप्त्याचे अडीच हजार रुपयांची रक्कम घेताना दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती.गोसावी हा आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असताना त्याने लाचखोरीचा प्रताप केल्याने पोलीस आयुक्तालयाने चौकशी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत गोसावी यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे.