Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नाशिक ZP: एकसाथ ८ कर्मचारी निलंबित; नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओंचा खळबळजनक आदेश, वडनेर भैरव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई, काय घडलं असं?

मुख्य संपादक : समाधान जगताप

प्रतिनिधी ,नाशिक : जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील आठ कर्मचाऱ्यांचे निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ग्रामपंचायत विभागातील दोन, बांधकाम विभागातील दोन, शिक्षण विभागातील तीन तर आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. विविध कारणांमुळे या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश मित्तल यांनी दिले आहेत.काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यात झालेल्या शिक्षण विभागाच्या सहविचार सभेत दोन शिक्षकांची हाणामारी झाली होती. याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. त्यामुळे या दोन्हीही शिक्षकांना निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर जिल्हा परिषद शाळा वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी) येथेही एप्रिल महिन्यात मित्तल यांनी भेट दिली परंतु, शाळेत कुणीही हजर नव्हते. पूर्वसूचना देऊनही शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करण्यात आले आहे.

तसेच वडनेर भैरव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी वारंवार तक्रारी दाखल येत होत्या. याबाबत मित्तल यांनी चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक पाठविले परंतु, वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे आढळले.रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असताना त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न कळवता गैरहजर असल्याचे आढळल्याने चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत विभागातील पंचायत समिती चांदवड तसेच वळवाडी (ता. मालेगाव) येथील ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.

लाचखोर उपअभियंताही निलंबित

सुरगाणा पंचायत समिती येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यांचेही निलंबन करण्यात आले आहे. तसेच बागलाण पंचायत समिती येथील उपअभियंता यांच्याबाबतदेखील काही आर्थिक कारणांवरून तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भात संबंधित उपअभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.